


हिंगणी : शेतशिवारामध्ये वीज पडल्याने शेतातील गोठ्यात ठेवलेले सर्व साहित्य जळून राख झाले तसेच दोन बैलही यात जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश शरद खडगी, रा. हिंगणी यांचा शेतात गोठा आहे. या गोठ्यामध्ये शेतीपयोगी साहित्य व बैल बांधलेले होते. रात्रीच्या सुमारास अचानक वीज पडल्याने शेतीपयोगी साहित्य, जनावरांची वैरण व पार्डप जळून राख झाले. यात त्यांचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या विजेमुळे दोन बैलही जखमी झाले. मंगळवारी सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती तलाठी व ग्रामसेवकांना देण्यात आली; पण ते घटनास्थळी पोहोचले नाही, अशी माहिती शेतकरी प्रकाश खडगी यांनी दिली. ऐन हंगामात बैल जखमी झाले असून शेतीसाहित्य जळाल्याने अडचण झाली.