Home ◼️ संपादकीय बालक मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय; कुटुंबीयांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न ! काँग्रेस...

बालक मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय; कुटुंबीयांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न ! काँग्रेस नेते अद्भूदय मेघे यांची पीडित कुटुंबाला भेट

वर्धा : केळझर परिसरात बेपत्ता झालेल्या बालकाचा तीन दिवसांनंतर तळ्यात मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने नवे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या मृत्यूमागे अपघात नसून घातपाताचा संशय असल्याची ठाम भूमिका मृत बालकाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. घटनेच्या तपासाबाबत कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या शंकांमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर ज्या तळ्यामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला, त्या तळ्याची आणि सभोवतालच्या परिसराची ग्रामस्थ, कुटुंबीय तसेच शोधपथकाकडून पाहणी करण्यात आली होती. मात्र त्या वेळी तळ्यात किंवा आजूबाजूच्या भागात कोणतीही संशयास्पद खुणा, कपडे, चप्पल किंवा हालचालींचे चिन्ह आढळून आले नव्हते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

तसेच मृतदेह तीन दिवसांपासून तळ्यातच होता, तर तो दुसऱ्याच दिवशी पाण्यावर तरंगून का आला नाही, असा थेट सवाल कुटुंबीय उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, संबंधित तळ्यात मोठ्या प्रमाणावर मासे असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून, जर मृतदेह तळ्यातच बुडून मृत झाला असता तर मासोळ्यांनी मृतदेहाचे लचके तोडले असते. मात्र मृतदेहावर तसे कोणतेही स्पष्ट जखमेचे किंवा लचके तोडल्याचे चिन्ह दिसून आले नसल्याचा दावा कुटुंबीयांकडून केला जात आहे.

या सर्व बाबी लक्षात घेता हा मृत्यू बुडून झाल्याची शक्यता कमी असून, मुलाची अन्यत्र हत्या करून मृतदेह नंतर तळ्यात आणून फेकण्यात आला असावा, असा गंभीर संशय कुटुंबीय व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ अपघाती मृत्यू म्हणून न करता घातपाताच्या दृष्टीने करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण केळझर परिसरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. निष्पक्ष व सखोल तपास होऊन सत्य समोर यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांकडूनही होत आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, तांत्रिक तपास आणि सर्व शक्य कोनातून तपास सुरू असल्याचे सांगितले असून, अहवालानंतर पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.

काँग्रेस नेते अद्भूदय मेघे यांची पीडित कुटुंबाला भेट

बालक मृत्यूच्या हृदयद्रावक घटनेनंतर काँग्रेसचे नेते अद्भूदय मेघे यांनी मृत मुलाच्या कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत दुःखाच्या प्रसंगी धीर दिला. ही घटना अत्यंत गंभीर असून तिचा सखोल, निष्पक्ष व पारदर्शक तपास होणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत प्रशासनाने तपासात कोणतीही कसूर करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनीच या घटनेचा लवकरात लवकर छडा लागावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!