
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत केळीच्या दरांवर सतत दबाव वाढत असून भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या उच्च दर्जाच्या केळीला प्रति क्विंटल सुमारे ८५० रुपये दर मिळत आहे, तर दुय्यम प्रतीच्या मालाला केवळ ३०० ते ४५० रुपयांदरम्यानच मागणी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
बाजारात मालाचा उठाव कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी दरात कपात केली आहे. परिणामी, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरातील या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत ठरत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे केळीची निर्यात विस्कळीत झाली आहे. भारतातील केळीला या देशांत मोठी मागणी असते, मात्र निर्यातीचा मार्ग अडकल्याने त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे. मागील महिन्यात जवळपास १००० रुपयांवर असलेले दर आता घसरून ८५० रुपयांपर्यंत आले आहेत.
दरम्यान, वाढत्या उन्हाचा फटका केळीच्या गुणवत्तेलाही बसत आहे. उष्णतेमुळे दर्जात घट होऊन दुय्यम प्रतीच्या मालाचे प्रमाण वाढले आहे. या मालाला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. नवीन लागवडीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. टिश्यू कल्चर रोपांची मागणी वाढली असून नामांकित कंपन्यांकडे बुकिंग पूर्ण झाले आहे. रोपांचे वाढलेले दर, व्यवस्थापनाचा वाढता खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे नवीन लागवड करू इच्छिणारे शेतकरी सध्या संभ्रमात आहेत.
























































