गांजा विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई ; ४ किलो गांजा जप्त

वर्धा : अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ४ किलो ५१ ग्रॅम गांजा तसेच दुचाकी व मोबाईलसह एकूण २ लाख ११ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन गिरड हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा कोरा, आकर वार्ड क्रमांक ३ येथील एका घरावर छापा टाकण्यात आला.

या छाप्यात संजय विनायक कोम्पलवार व त्याची पत्नी ज्ञानेश्वरी संजय कोम्पलवार हे दोघे संगनमताने गांजाची विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ जप्ती पंचनामा करून आरोपींच्या ताब्यातून ४ किलो ५१ ग्रॅम गांजा, होंडा शाईन मोटरसायकल (एमएच ३२ एझेड ९६९०) आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन गिरड येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here