Home ◼️ संपादकीय वर्धा–बल्लारशाह थर्ड लाईनची सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी; २२ मे रोजी 130 किमी वेगाने...

वर्धा–बल्लारशाह थर्ड लाईनची सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी; २२ मे रोजी 130 किमी वेगाने होणार स्पीड ट्रायल

वर्धा : मध्य रेल्वेकडून उभारण्यात आलेल्या वर्धा–बल्लारशाह तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या (थर्ड लाईन) अंतिम टप्प्यात आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर २२ मे रोजी नव्या मार्गावर अतिवेगाने रेल्वे धाववून स्पीड ट्रायल घेण्यात येणार असून रेल्वे प्रशासनाकडून यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पांतर्गत तडाली ते विवेकानंद नगर दरम्यान सुमारे ११.२३५ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात आलेला मार्ग वेगवान रेल्वे संचालनासाठी सुरक्षित आणि सक्षम आहे का, याची खातरजमा करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते.

या तपासणीदरम्यान विशेष रेल्वेगाडी तब्बल ताशी १३० किलोमीटर वेगाने चालवून ट्रॅक, सिग्नल यंत्रणा, पूल, वळणे तसेच सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घेतली जाणार आहे. या प्रक्रियेला ‘स्पीड ट्रायल’ असे म्हटले जाते. रेल्वे प्रशासनासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, स्पीड ट्रायलदरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. रेल्वेमार्गालगतच्या गावांमध्ये जनजागृती करण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…

२२ मे रोजी स्पीड ट्रायलदरम्यान रेल्वे अतिउच्च वेगाने धावणार असल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विशेषतः लहान मुलांना रेल्वेमार्गाजवळ जाऊ देऊ नये, कोणीही रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच पशुपालकांनी जनावरे रेल्वे परिसरात सोडू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहतूक क्षमतेत होणार वाढ…

वर्धा–बल्लारशाह हा मार्ग मध्य रेल्वेसाठी महत्त्वाचा मानला जातो. तिसरी लाईन सुरू झाल्यानंतर मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांची वाहतूक अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून रेल्वेवरील ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!