विचित्र अपघातात ‘सत्याग्रही’ घाटात ‘शिवशाही’ उलटली! पलटी झालेल्या बसला ट्रकची धडक; प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला

वर्धा : ट्रकच्या धडकेपासून वाचण्यासाठी शिवशाही चालकाने केलेल्या प्रयत्नात चक्क शिवशाही बस रस्त्यावरच पलटली. दरम्यान मागाहून भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने शिवशाहीला धडक दिली. तसेच एका कारलाही धडक दिली. हा विचित्र अपघात तळेगावच्या सत्याग्रही घाटात २६ रोजी रात्रीच्या सुमारास झाला. सुदैवाने शिवशाही बसमध्ये असलेल्या २० प्रवाशांना कुठलीही इजा झाली नसून त्यांचा जीव वाचला.

नागपूरच्या दिशेने जाणारा एम. एच. २८ बी. बी. ३८५५ क्रमांकाच्या ट्रक चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ट्रक मागे येऊ लागला. ट्रकच्या मागेच एम. एच. ०६ बी. डब्ल्यू. ०९०३ क्रमांकाची शिवशाही बस येत होती. बसचालकाला ट्रक मागे येत असलेला दिसताच चालकाने बसला अपघातापासून वाचविण्यासाठी बस बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने स्टेअरिंग वळविताच शिवशाही बस रस्त्यावर पलटली. शिवशाही बसमध्ये एकूण २० प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, सुदैवाने कुणालाही इजा पोहचली नसून त्यांचा जीव थोडक्यात वाचला.

अपघातग्रस्त शिवशाही बस रस्त्याच्या मधातच पलटल्याने त्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक ट्रकने पुन्हा धडक दिली. यात बसचे नुकसान झाले. याच अपघातात एका कारलादेखील धडक लागल्याने कारचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या विचित्र अपघाताची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच गजानन बावणे, बालाजी मस्के, राहुल अमोने, कृणाल कांबळे यांनी अपघातस्थळी पोहचून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here