बसस्थानकातून बस निघू देणार नाही! अंबिका हिंगमिरे यांचा इशारा; उपोषणकर्त्यांशी साधला संवाद

वर्धा : एसटी महामंडळाचा डोलारा ज्या चालक व वाहकांच्या भरवशावर आहे, त्याच चालक, वाहकांना महामंडळ आणि राज्य सरकार वेठीस धरत आहे. किमान वेतन नियमाने त्यांना दिले जात नाही. भत्ते नाहीत तसेच दिवाळीचा बोनस देखील नाही. गत तीन दिवसांपासून चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद ठेवला आहे. जर सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर वर्धा बसस्थानकातून एकही बस निघू देणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तथा श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमिरे यांनी दिला आहे.अंबिका हिंगमिरे यांनी एसटी चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषण मंडपाला भेट देत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांची विचारपूस केली.

एसटी चालक, वाहक यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बंद पुकारला आहे; मात्र ऐन सणासुदीला सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी आपले कर्तव्य बजावून कर्मचारी आपल्या हक्कासाठी उपोषण करत आहेत, ही शोकांतिका आहे.गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू असून सरकारने कुठलीही दखल घेतलेली दिसून येत नाही. अंबिका हिंगमिरे यांनी उपोषणस्थळी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उपोषणकर्त्यांनी हिंगमिरे यांना मागण्यांचे निवेदन दिले. शासनाला आपण पत्रव्यवहार करून मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करु, अन्यथा सरकारविरोधात आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला.

विधानभवनावर काढणार मोर्चा

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या या रास्त आहेत. शासनाने त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर वर्धा बसस्थानकातून एकही बस बाहेर जाऊ देणार नाही, इतकेच नव्हे तर विधानभवनावर मोर्चा काढून कर्मचार्‍यांना त्यांचा हक्‍क मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असा हशारा अंबिका हिंगमिरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here