
समुद्रपूर : तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एक दिवसाच्या नवजात बाळाच्या आईसह एकूण तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटना बुधवारी उघडकीस आल्या असून पोलिसांनी त्याची नोंद घेतली आहे. चंद्रपूर येघील रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर आईची प्रकृती ढासळली. उपचाराकरिता नागपूर येथे नेले जात असताना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील जाम शिवारात पोहचल्यावर या मातेची प्रकृती अधिक खालवली. त्यामुळे तिला समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. शीतल राजू सोयाम (२५) रा. चेक बोरगाव, ता. गोंडपिंपरी, जि. चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव आहे.
दुसरी घटना किन्हाळा येथे घडली. किन्हाळाच्या आकाश रामू बैलमारे याचा मृतदेह गावाजवळील कामडी यांच्या शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच विनायक खेकडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर तिसरी घटना मंगरूळ येथे घडली, विद्यमान बळीराम हिवरकर (६०) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराच्या आवारातील विहिरीत आढळल्याने गिरड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. गिरड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.




















































