ट्रॅव्हल्स आयशरच्या धडकेत चालक जागीच ठार ; खडकीच्या पेट्रोल पंप जवळची घटना : ट्रॅव्हल्सचा चालक फरार

सेलू : विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने वर्धेकडे जाणार्या आयशरला समोरून धडक दिल्याने वालवाहूचा चालक जागीच ठार झाल्याची घटना नजीकच्या खडकी शिवारात रविवार (ता. १२) पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. शशिकांत संग्राम माने (वय २४) वर्षे रा.परभणी असे मृत मालवाहू चालकाचे नाव आहे. दरम्यान अपघात पाहत पाहत जाणार्या इंडिका कारला मागून अज्ञात वाहनाने धडक देत पळ काढला. सुदैवाने कार चालक बचावला. या दुर्घटनेला कारणीभूत ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.

सिंदी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक MH-29 AM-8777 ने नागपूरकडून वर्धेकडे येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH-12 SX- 1835 ला विरुद्ध दिशेने येत धडक दिली. या दुर्घटनेत आयशर चालक शशिकांत संग्राम माने (24) जागीच ठार झाला. दरम्यान, रस्त्यावर झालेला अपघात पाहत असताना नागपूर कडून येणाऱ्या इंडिका MH-31 DV-2655 क्रमांकाच्या कारला मागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात सुदैवाने कार चालक थोडक्यात बचावला.

अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. सोनपितळे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतक शशिकांत माने याचा मृतदेह कॅबिनमधून काढून उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील सामान्य रुग्णालयात पाठविला. पंचनामा करून ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९ ,३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि. चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनपितळे, जमादार जावेद धामिया करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here