अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने खळबळ! बुधवारी विहिरीत आढळला मृतदेह; आर्वी पोलिसांनी घेतली नोंद

आर्वी : शहरातील कंपोस्ट डेपोच्या लगतच असलेल्या विहिरीत १५ वर्षीय मुलीने उडी घेत आत्महत्या केली. ही घटना संजयनगर परिसरात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

शेख हनीफ शेख चांद हे मध्यरात्रीच्या सुमारास उठले असता त्यांना मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी रात्रीच सर्वत्र शोध घेतला.पण, ती कुठेही मिळून आली नाही. पहाटेपासून पुन्हा शेजारच्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर संजयनगर येथील न.प.च्या कंपोस्ट डेपोच्या आवारात असलेल्या राजू गभने यांच्या शेतातील विहिरीलगत तिचा दुपट्टा दिसला.

मात्र विहिरीत मृतदेह दिसून आला नाही. नीलेश रमेश मडामे, रा. वाढोणा पुनर्वसन याने विहिरीत उडी घेत शोध घेतला असता मृतदेह कपारित अडकलेला दिसला. बाजीला दोर बांधून शेख जावेद शोख बशीर, राजेश नांदुरकर, अरबाज शहा, प्रदीप बोरकर, रवी घाडगे यांनी मृतदेह बाहेर काढला. आर्वी पोलीस ठाण्याचे देवानंद केकन, सागर गिरी, राऊत, उमेश कुंभरे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी आर्वी पोलिसांत दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. यावेळी पोलिसांनी विहिरी सभोवताल झालेली गर्दी नियंत्रणात आणली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here