न्यायालयाचे खोटे दस्तऐवज तयार करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या दोघांना अटक! कारंजा पोलिसांची कारवाई

गजानन बाजारे

कारंजा (घाडगे) : न्यायालयाचे खोटे दस्तऐवज तयार करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याला व या प्रकरणात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या आरोपी फोटोग्राफरला कारंजा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पवन कडवे यालाही अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1 कॉम्पुटर,1cpu, 1 की बोर्ड, 1 माउस ,1 स्कॅनर प्रिंटरवाला असा एकूण 24 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कारंजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा येथील रविकांत सूर्यकांत गाडरे वय 40 या व्यक्तीचे आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील युवतीशी दुसरे लग्न झाले होते तीन ते चार वर्ष दोघांनीही संसाराचा गाडा सुखाने चालविला परंतु कालांतराने त्यांच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने त्यांची सोडचिठ्ठी झाली होती परंतु आरोपी मुलीकडील लोकांना सोडचिठ्ठी झाल्यानंतरही सतत त्रास द्यायचा यातच आरोपी रविकांत यांच्या पत्नीच्या भावाचे म्हणजेच साळ्याचे लग्न कारंजा तालुक्यातील परसोडी येथे जुळले होते.

परंतु आकसापोटी आरोपीला ते लग्न होऊ द्यायचे नसल्याने आरोपी सतत सासरकडील लोकांना व ज्या मुली सोबत लग्न जुळले होते त्या मुलीकडील लोकांकडे फोन करून धमकी देत होता की हे लग्न मी कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही त्यासाठी आरोपी रविकांत गाडरे याने वेगवेगळ्या शक्कल लढविल्या त्याने बांद्रा मुंबई येथील कौटुंबिक न्यायालयाचे खोटे दस्तऐवज तयार केले व ते कारंजा पोस्ट ऑफिस मधून कारंजा पोलिसांना पाठविण्यात आले त्या खोट्या पत्रात लग्न तोडण्याचे नमूद करण्यात आले होते, तसेच ज्या मुली सोबत आरोपीच्या साळ्याचे लग्न जुळले होते त्या मुलीकडे सुद्धा अज्ञात दुसऱ्या मुलीच्या नावाने पत्र पाठविले व त्यात नमूद केले की माझे तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पूर्वीच लग्न झाले आहे तू त्याच्या सोबत लग्न करू नको असे बनावट दुसरे पत्र परसोडी येथील मुलीच्या घरच्या पत्त्यावर पाठविले.

परंतु आठ ते नऊ महिन्यानंतर कारंजा पोलिसांच्या लक्षात आले की प्रत्यक्ष न्यायालयाचे याबाबत पत्र आपल्याला येऊ शकत नाही त्यामुळे कारंजा पोलिसांनी त्या पत्राची शहानिशा करण्यासाठी एक पथक बांद्रा मुंबई येथे पाठविले असता अशा प्रकारचे कोणतेही पत्र न्यायालयाने न दिल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर कारंजा पोलिसांनी कारंजा पोस्ट ऑफिस मध्ये चौकशी केली असता हे पत्र कारंजा पोस्ट ऑफिस मधून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले या प्रकरणाचा जुना इतिहास लक्षात घेऊन कारंजा पोलिसांनी आरोपीचा फोटो कारंजा पोस्ट ऑफिसला दाखविला असता हाच व्यक्ती पत्र टाकण्यासाठी आला असल्याचे निष्पन्न झाल्याने कारंजा पोलिसांनी आरोपी रविकांत गाडरे विरुद्ध कलम 465/ 466/ 469 /470/ 472 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आरोपीला कारंजा न्यायालयापुढे हजर केले असता आरोपीला 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास डीवायएसपी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दारासिंग राजपूत यशवंत गोहत्रे, प्रवीण चोरे, निलेश मुंडे, कोमल वानखडे, करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here