वर्धा : अल्पवयीन मुलीला विवस्त्र करीत तिचा मृतदेह पुरवून पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे उघडकीस आली होती. आरोपी नराधम हा कारागृहात आहे. आरोपी नराधम सतीश याला प्रेयसी आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात अडकविणार असल्याची भीती असल्याने ही क्रूर घटना करण्याचे पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. आरोपी सतीश जोगे याने अवघ्या १४ वर्षीय मुलीला विवस्त्र करून तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना २१ रोजी उजेडात आली होती. सेवाग्राम पोलिसांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकून पोलीस कोठडी मिळविली. कोठडीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर केले. मृतक मुलगी आणि तिचा देवळी येथील ‘बॉयफ्रेंड’ ‘गणेश’ हे दोघं मिळून आरोपी सतीशला पोलिसांच्या जाळ्यात अडकविणार होते, याची चुणूक सतीशला लागली आणि सतीशने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.
मृत प्रेयसीला दिला होता चोरीचा मोबाइल भेट
आरोपी सतीश जोगे याने पवनार येथील नंदीघाट परिसरात फिरण्यास आलेल्या युवक आणि युवतीचा मोबाइल जबरीने हिसकावून घेतला होता. त्यातील एक मोबाइल त्याने मृतक प्रेयसीला दिला होता. त्यामुळे मृतक मुलगी आणि तिच्या दुसऱ्या प्रियकराने सतीशला पोलिसांत अडकविण्याचा प्लॅन आखला होता, त्यामुळे सतीशने तिचा खून केला.
सतीश लिहायचा दिनचर्या…
आरोपी नराधम सतीश जोगे याला दररोजची दिनचर्या लिहिण्याची सवय होती. त्याने मृतक मुलीला कसे मारले, कोणत्या कारणामुळे मारले, तसेच तिच्याशी केव्हा आणि कोठे संबंध बनविले आदी विविध गोष्टींची नोंद तो त्याच्याजवळील वहीत लिहून ठेवायचा, असे त्याच्या काही मित्रांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून सतीशचे हे बिंग फुटले.
सिंदी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
आरोपी सतीश जोगे याच्याविरुद्ध सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून याप्रकरणात सहा ते सात महिने त्याला कारागृहाची हवादेखील खावी लागली होती हे विशेष.