विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह! दोन दिवसांपासून होती बेपत्ता; काचनगाव शिवारातील घटना

येरला : हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शेतशिवारातील विहिरीत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीच्या अकाली मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. मृत मुलीचे नाव भूमिका दशरथ महाजन (वय 14) असे आहे. भूमिका 1 डिसेंबरपासून हरवली होती. तिचा सवंत्र शोध घेण्यात आला, पण ती कुठेच मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी 3 डिसेंबरला सकाळी विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.

भूमिका बुधवारी घरून शेतात कापूस वेचण्याकरिता गेली होती. तेथून ती आईसोबत पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली. त्यानंतर तिचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे वडनेर पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. गुरुवारी पोलिसांनी गावात येऊन सर्वत्र शोध घेतला. अखेर गावालगत असलेल्या विहिरीजवळ तिची चप्पल आढळून आली. शोध घेतला असता पाण्यात मृतदेह आढळून आला. वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.

वडनेर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उमेश ठोंबरे, पीयूष बागडे, मनोज धात्रक, पोलिस कर्मचारी लक्ष्मण केंद्रे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तपास वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत. भूमिका महाजन हिच्या मृत्यूने काचनगाव गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here