

वर्धा : आजोबाच्या नावे असलेली मालमत्ता बनावट मृत्यूपत्र आणि बनावट विक्रीपत्र सादर करून मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला असून याप्रकरणी रामनगर पोलिसांनी राजेश जयस्वालसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.
राजेश श्यामलाल जयस्वाल, बन्स बहादूर बेहजनाथ प्रसाद मिश्रा रा. पन्ना नाका उमरा जि. सतना, लक्ष्मण रामचंद्र जुधे रा. सावंगी मेघे, शांतीलाल शाह रा. वर्धा, कमलाकर नारायण सायंकार रा. वर्धा, अँड. एस.जे. अली यांच्यासह ग्रामसेवक आणि सालोड ग्रा.पं.च्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. शहरातील गौरक्षण वॉर्ड येथील पॅन्थर चौकात स्व. डॉ. तपलशेट्टी सत्यनारायण नायडू उर्फ डॉ. टी. एस. नायडू यांनी गोकुलदास जोहरमल कलंत्री यांच्याकडून शीट नं. २० भूखंड क्र. ११ असा ६, ९७२ स्वे.फूट अशी मालमत्ता नोंदणीकृत विक्रीपत्राने खरेदी केली होती. तो भूखंड जमनालाल सेवा ट्रस्ट यांच्याकडून गोकुलदास जोहरमल कलंत्री यांनी खरेदी केला होता. मात्र, राजेश जवस्वाल याने डॉ. नायडू यांच्या नावाचे बनावट विक्रीपत्र तयार करून सदर भूखंड स्वत:च्या नावे केला.
त्यावर साक्षीदार म्हणून पीयूष शाह, के. एन. सायंकार यांनी स्वाक्षऱ्या करून तो भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावला. याप्रकरणी डॉ. नायडू यांचा नातू सी. सतीशकुमार रा. सिकंदराबाद यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून हे प्रकरण रामनगर पोलिस ठाण्यात वर्ग केले. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी राजेश जयस्वालसह इतर सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.