आदिवासी बांधवांचा संसार आला रस्तावर! खापरी ग्रामपंचायतने काढले कोलगावातील अतिक्रमण

सेलू : नजीकच्या कोलगाव येथील आबादी जागेवर काही आदिवासी समाज बांधवांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या. बुधवारी ९ मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात खापरी ग्रा.पं. ने त्यांच्या झोपड्यांवर गजराज चालवून अतिक्रमण काढल्याने आदिवासी समाजातील नागरिकांचा संसार उघड्यावर आला. कोलगाव येथे आदिवासी बांधवांची १०० घरांची वस्ती आहे. त्यांनी गावातील आबादी जागेवर तुराट्या, ताट्या व टिनाच्या झोपड्या बांधून घरे उभी केली होती. त्यातील काहींना शासकीय घरकुलही मंजूर झाले आहे. पण, त्यांच्याजवळ हक्काची व स्वमालकीची जागा नसल्याने घरकुल बांधकाम करता आले नाही. ग्रामपंचायतीनेदेखील त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली नाही.

अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव मोलमजुरी करून त्या जागेवर वास्तव्य करीत असतानाच त्यांचे अतिक्रमण नियमाकुल झाले नाही, असे कारण समोर करून त्या जागेवर व्यायामशाळा बांधायची असल्याचे सांगून सरपंच प्रमोद गव्हाळे, ग्रामसेवक शेटे यांनी बुधवारी अतिक्रमणावर जेसीबी चालवून आदिवासींचा संसार उघड्यावर आणला. यावेळी सरपंच प्रमोद गव्हाळे, उपसरपंच पुरुषोत्तम वैद्य, पोलीस उपनिरीक्षक गजानन कंगाले, मंडळ अधिकारी भोले, तलाठी घोडके, पोलीस पाटील कविश कोटंबकार, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते. अतिक्रमण असलेली घरे पाडण्यात आल्याने १० ते १५ आदिवासी लोकांचा संसार उघड्यावर आला असून, त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा ठाकला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here