

वर्धा : लग्नाचे आमिष देत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ वर्षीय युवतीची ओळख प्रवीण पुरुषोत्तत काकडे याच्याशी झाली. त्यानंतर त्याने पीडितेला लग्नाचे आमिष देत प्रेमजाळ्यात फासले. मागील पाच वर्षांपासून प्रवीण पीडितेवर वारंवार अत्याचार करीत होता. त्याने पीडितेला पुण्याला बोलावून तेथील लॉजवर नेऊनही शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
इतकेच नव्हे तर नागपूर येथील लॉजवर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी पीडितेला प्रवीणचे लग्न दुसर्या मुलीशी जुळल्याची माहिती मिळाली. दरम्यान पीडिता ही पुन्हा प्रवीणला भेटण्यासाठी पुण्याला गेली. तिने लग्नाची गळ घातली असता प्रवीणने तिला नकार दिला. अखेर हतबल पीडितेने याबाबतची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.