
हिंगणघाट : पालिकेच्या सफाई कामगारांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांकरिता १७ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले. मात्र, अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. १७ ऑगस्टला कामबंद आंदोलनाचे निवेदन दिल्यानंतर दुपारी पालिका प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्याशी यासंबंधी चर्चा झाली. परंतु, चर्चा निष्फळ ठरल्याने सफाई कर्मचाऱयांचा संप सुरूच आहे.
कर्मचारी संघटनेने नगरपालिका प्रशासनासोबत केलेल्या कसराचा सफाई कर्मचारी संघटनेने विरोध केला असून त्यांनी घेतलेला निर्णय मान्य नसल्यानेही सफाई कामगारांनी विरोधी भूमिका घेतली आहे. सफाई कामगारांनी मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन समस्या मांडल्या. तोडगा न निघाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्याशी झालेल्या भेटीत या म्रागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास कामगारांना आमंत्रित करण्यात आले, या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्याधिकारी जगताप यांना विचारणा केली असता सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळाले नाही,
पालिकेलाच आपल्या फंडातून सातवा वेतन आयोग लागू करायचा असून कोरोनाकाळात पालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. दिवाळीपर्यंत आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यास कर्मचाऱ्यांना सातवा वेतनआयोग लागू करु, अशी माहिती दिली. सफाड कामगारांच्या थकीत वेतनाविषयी विचारणा केली असता पालिकेच्या वतीने सफाई कामगारांना संपूर्ण वेतन दिले असून कोणतेही वेतन थकीत नसल्याची माहिती त्यांनी प्रतिनिधीला दिली.
सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसोबतच १२ व २४ वर्षांच्या पदोन्नतीची राशी मिळावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदानाची राशी मिळावी, कर्मचाऱ्यांनी विविध बँकांतून घेतलेल्या कर्जांची किस्त भरण्यात यावी, कर्मचारी राहत असलेले कॉर्टर त्याच्या नावावर करण्यात यावे आदी या मागण्याही सफाई कामगारांच्या संघटनेने पुढे केल्या असून संघटनेचे हिंगणघाटचे अध्यक्ष रोहित रंगीलाल बक्षी यांच्या नेतृत्वात हा लढा सुरू आहे.