गांजाची वाहतूक करणारे दोघे जेरबंद ! हिंगणघाटजवळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; १.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट : जिल्ह्यात अंमली पदार्थांचा उपद्रव रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कंबर कसली असून, मंगळवारी (दि. १) मोठी कारवाई करत दोघांना गांजासह रंगेहाथ पकडले. हिंगणघाटजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील हॉटेल संस्कारजवळ ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना मौजा रिमडोह शिवारातून जामकडून हिंगणघाटकडे येणाऱ्या वाहनांविषयी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने हॉटेल संस्कारजवळ मोठ्या मारोती मंदिरासमोर सापळा रचला. त्यावेळी दोन तरुण संशयास्पदरीत्या येताना दिसले. त्यांची झडती घेतली असता, आरोपी अंकित भाविक वावरे (१९, रा. फुकटा, आजनसरा, ह.मु. हिंगणघाट) यांच्या पाठीवरच्या शाळेच्या बॅगेत १.०३७ किलो गांजा आढळून आला. त्याच्यासोबत असलेला खेमेश भेरूदास भुते (२१, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट) यालाही ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत या दोघांनी हा गांजा नागपूरच्या फैजान (रा. मोमीनपुरा) याच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून पोलिसांनी १.०३७ किलो गांजा (किंमत रु. २०,७४०), मोरपंखी निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (एम.एच. ४९ बी.एन. ६४९८) किंमत १ लाख, दोन मोबाईल (रु. ३०,०००) व शाळेची बॅग (रु. २५०) असा एकूण १,५०,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स.पो.नि. अतुल थुल (हिंगणघाट), पो.उपनि. प्रकाश लसुंते, तसेच मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक (स्थ. गु. शा. वर्धा) व फॉरेन्सिकचे अनिल साटोणे, अजित धांदरे, मंगेश धामंदे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here