कोरोनाकाळापूर्वी मंजूर झालेला मार्ग कोरोनानंतर केला नामंजूर! आंजी-विरूळ मार्गाची अवस्था

वर्धा : कोरोनाकाळापूर्वी आंजी ते विरूळ या मार्गाला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हॅमअंतर्गत मंजुरी दिली होती; पण त्यानंतर कामाला गती दिली नसल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. आता कोरोनानंतर यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केल्यास मान्यता नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मार्गाच्या निर्मितीकरिता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी १० वाजता आंजी (मोठी) येथील बसस्थानक चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.

आजी (मोठी) येथून विरूळकडे जाणारा आंजी ते मांडवा हा आठ किलोमीटरचा मार्ग अत्यंत खराब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देण्यात आली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. आंजी हे गाव बाजारपेठेचे असून, येथे बरेच लोक व्यापार, शिक्षण, आरोग्य, बँकेचे व्यवहार करण्याकरिता नेहमी ये-जा करतात. त्यामुळे त्यांना या मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आंजी येथून वर्धा ते आर्वी महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी व व्यापारी यांना त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गाच्या दोन्ही बाजूने निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक लावले असून, अद्यापही मार्गाच्या कडा बुजविल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. यासह आर्वी- वर्धा मार्गाच्या दोन्ही बाजूला धाम नदीच्या पुलापासून, तर पवनूर जोड रस्त्यापर्यंत विद्युत दिवे लावले नाहीत, त्याकरिता आंजीमध्ये रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here