सिंचन विहिरीचे काम पूर्ण! अनुदानाचा पत्ता नाही; शेतकऱ्यांना प्रतीक्षा: अडचणीत भर

Old Water Well Credit: Getty

रोहना : शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडावी, याकरिता शासनाकडून धडक सिंचन विहिरीची योजना राबविली. या योजनेंतर्गत विहिरी मंजूर करून त्याचे बांधकामही करण्यात आले, पण आता विहिरींचे बांधकाम होऊन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटला, तरीही अनुदानाची रक्‍कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

शासनाकडून दोन वर्षांपूर्वी धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी मंजूर केल्या. दरम्यान, कोरोना काळामुळे काही विहिरींचे काम रखडले, तर काही शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून विहिरीचे काम मुदतीत पूर्ण केले. मुदतीत काम पूर्ण करणाऱ्या काही शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले, परंतु ज्यांच्या विहिरीचे काम थोड्या विलंबाने झाले, त्या शेतकऱ्यांच्या विहिरींची पाहणी व मोजमाप करून संबंधित विभागाच्या अभियंत्याने अनुदानाचा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविला, असे सांगितले जाते. आता या गोष्टीला वर्षभराचा कालावधी लोटला, तरीही अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांची जमापुंजी व उसनवारी घेतलेले पैसे या विहिरीच्या कामात लागले असून, अद्यापही अनुदान मिळाले नसल्याने आर्थिक लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहे. त्यामुळे तातडीने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here