पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद! सावंगी रुग्णालय परिसरात ठोकला होता मुक्काम

वर्धा : येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात बिबट आढळून आला. यामुळे एकच तारांबळ उडाली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबटाला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रुग्णालयाच्या नालीत शिरला. येथे त्याच्यावर बेशुद्ध करण्याच्या औषधाचा मारा करून पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर जेरबंद करण्यात आले.

सोमवारी (ता. २५) दहा वाजताच्या सुमारास बिबट शालिनीताई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला दिसताच याची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली. यावेळी वॉर्डाची सर्व दारे बंद करण्यात आली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वनविभाग तसेच पोलिसांना माहिती देत पाचारण करण्यात आले.

बिबट्याने परिसरातील दुमजली इमारतीवरून थेट करंजीच्या झाडावर उडी घेतली. येथून तो खाली उतरला आणि रस्त्यालगत असलेल्या नालीमध्ये गेला. यावेळी कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी पोलिस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता बंद करण्यात आला होता.

बिबट नालीत शिरल्याने ती नाली जेसीबीच्या माध्यमातून खोदण्याचे काम सुरू करण्यात आली. मात्र, त्याचा काहीच लाभ होत नसल्याचे दिसून आहे. जवळपास पाच तास उलटल्यानंतरही वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, नागरिकांची उत्सुकता वाढल्याने परिसरात गर्दी केली होती. नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here