महापुरुषांना अपेक्षित ध्येय गाठा त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करा ; प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे

पवनार : “महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे ब्रीद आत्मसात करत आपले ध्येय गाठा. मात्र हे ध्येय गाठल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी, समाजबांधवांच्या उन्नतीसाठी केला, तरच आपण महापुरुषांच्या अपेक्षेनुसार कार्य करत आहोत,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी केले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमानिमित्त पवनार येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, भीम टायगर सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विशाल नगराळे, माजी सरपंच अजय गांडोळे, विजय बेंडे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सहदेव चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“महापुरुषांचे विचार हे केवळ जयंतीपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष आयुष्यातही ते आचरणात आणले पाहिजेत. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी आपली आहे, आणि ती प्रत्येकाने स्वतःपासून सुरू केली पाहिजे,” असेही प्रा. खोब्रागडे यांनी नमूद केले.

कार्यक्रमात बोलताना बबलू राऊत म्हणाले, “आजचे नवयुवक भरकटलेले असून व्यसनाधीनतेकडे वळले आहेत. अशा स्थितीत महापुरुषांचे विचार त्यांना योग्य दिशा दाखवू शकतात. त्यामुळे नव्या पिढीला थोर महापुरुषांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेस कोणी मार्गदर्शन करेल असे न समजता, या विचारांची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन करणारे विजय बेंडे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करून त्यांच्या विचारांचे सामाजिक पातळीवर प्रसारण करत आलो आहोत. मात्र आजही आपला समाज मागासलेला, अशिक्षित आहे. जसे मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला महापुरुष घडवून दिले त्याचप्रमाणे आजच्या पिढीला योग्य दिशा देणे ही आईची जबाबदारी आहे. त्यामुळे आईने आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाला बाळू गवळी, भगीरथ वानखेडे, रमेश धोंगडे, अशोक लोखंडे, योगीराज वानखेडे, संदीप पडघान, अनिल मुंगले, भैय्याजी मुंगले, मुन्ना वानखेडे, शेखर लोखंडे, प्रफुल मुंगले, अजय जाधव, गुड्डू मुंगले, वैष्णव गायकवाड, छाया वानखेडे, ताराबाई पडघान, ज्योत्स्ना गवळी, रितू जाधव, डॉली मुंगले, नंदनी पडघान यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल मुंगले यांनी केले तर आभार राहुल खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here