धावत्या ट्रकने घेतला पेट! चालक व वाहक बचावले

कोंढाळी : कोळसा घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकने वाटेतच पेट घेतला. ही बाब लक्षात येताच ट्रकचालक व वाहकाने केबिनमधून उडी घेत पळ काढला. त्यामुळे या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली तरी संपूर्ण ट्रक जळून राख झाला. ही घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हरदोली शिवारात रविवारी (दि. २४) पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

ट्रकचालक लक्ष्मण नायडू (४०, रा. कमाल चौक, नागपूर) व वाहक अमरसिंग चव्हाण (४०, रा. नागपूर) दोघेही एमएच-४०/एके-१३८१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये कोळसा घेऊन नागपूरहून अमरावती मार्गे वापी (गुजरात) येथे जात होते. ते हरदोली शिवारात पोहोचताच ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे व स्पार्किग होत असल्याचे लक्ष्मण नायडू याच्या लक्षात आले. त्याने लगेच ट्रक रोडच्या कडेला उभा केला आणि दोघांनीही केबिनमधून उडी घेत दूरवर पळ काढला.

ट्रकमध्ये कोळसा असल्याने तसेच कोळसा ज्वालाग्रही असल्याने आगीने अल्पावधीतच उग्र रूप धारण केले. त्या दोघांनीही लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी नजीकच्या सोलार कंपनीतील अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले, अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रकच्या आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत ट्रकचा बहुतांश भाग व त्यातील कोळसा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. या आगीमुळे महामार्गाच्या नागपूर- कोंढाळी लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here