दहा हजारांच्या वादातून महिलेची हत्या! आरोपीने दिली गळा चिरल्याची कबुली; इंदिरानगरातील घटना: दोन दिवस कोठडी

यवतमाळ : येथील लोहारा भागातील इंदिरानगरमध्ये दहा हजार रुपयांच्या व्यवहारातून महिलेचा चाकूने गळा चिरला, अशी कबुली आरोपीने दिली आहे. यातील मृतक व आरोपी या दोघांचाही दुधाचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांचे आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार होते. केवळ दहा हजारांसाठी थेट महिलेचा जीव घेण्यासारखी गंभीर

घटना शनिवारी सायंकाळी घडली.यातील आरोपीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सविता नरेंद्र जाधव या महिलेकडे म्हशी आहेत. ती दुधाचा व्यवसाय करीत होती. तर आरोपी पवन जयंत चेके रा. इचोरी याचाही दुधाचाच व्यवसाय आहे. आरोपीने महिलेकडून दहा हजार रुपये उसनवार घेतले होते. त्याबदल्यात महिलेने पवनचा मोबाईल ठेवला होता. यातूनच शनिवारी वाद झाला. संतापलेल्या पवनने धारदार चाकूने महिलेच्या गळ्यावर वार केला. तिच्या मदतीला मुलगा दिनेश धावून आला असता पवनने त्याच्यावरही हल्ला केला.

लोहारा पोलिसांनी पवन चेके याला लोहारा परिसरातच अटक केली. गुन्ह्याचा अधिक तपास लोहारा ठाणेदार अनिल घुजल करीत आहेत. केवळ दहा हजार रुपयांसाठी थेट खुनापर्यंत हा वाद पोहोचला. त्यामुळे या घटनेने शहरातील गुन्हेगारीवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here