
मांडगाव : हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सास्ताबाद या गावात एका रोडरोमिओने एकतर्फी प्रेमातून आपल्या प्रेयसीला अंगावर पेट्रोल टाकून जाळून जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली आहे. ही घटना तक्रारीनंतर उघडकीस आली आहे. तक्रारकर्ती तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. ती रोज सास्ताबाद येथून पायदळ तरोडा बसस्थानकावर जाते.
७ मार्चला सांयकाळी तरोडा बसस्थानकावरून सास्ताबादच्या दिशेने ही तरुणी जात असताना आरोपी तरुणाने तिचा पाठलाग करून तिला वाटेत अडविले. त्यानंतर त्याने मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्या सोबत संबंध ठेव असे म्हटले. तरुणीने आरोपीला नकार दिला असता त्याने तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कुणालाही दिली नाही.
पण नंतर तरुणाचा त्रास वाढल्याने घाबरलेल्या या तरुणीने स्वतःला सावरत आरोपीच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली. वडिलांना या घटनेची माहिती का दिली, असे म्हणत तरुणाने १८ मार्चला सायंकाळी तरुणीच्या घरी जात चक्क पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला करीत आहेत.

















































