
आष्टी (शहीद) : नजीकच्या पोरगव्हाण येथील एका युवतीने गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रगती मुरलीधर बोरीवार (१७) असे मृत युवतीचे नाव आहे. प्रगती ही शनिवारी दुपारी ४ वाजतापासून घरून बेपत्ता होती. रात्री उशीर झाला तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांकडून शोध घेण्यात आला.
दरम्यान, आज गावालगत असलेल्या सुदाम वाघ यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. बैलांना पाणी पाजण्यासाठी मंगेश सायरे हे गेले असता विहिरीत मृतदेह असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने घटनेची माहिती ग्रामस्थांना देत पोलिसांना दिली. माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरवीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.




















































