अल्पवयीन मुलीवर अत्याचाराने आर्वीत खळबळ! खासगी रुग्णालयाने उपजिल्हा रुग्णालयात केले रेफर

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाच्या घटनेने खळबळ उडाली असता तोच पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणात पॉस्कोंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान पीडिता ही गर्भवती असल्याचे तपासणीत लक्षात आले. मात्र, कदम हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकाराने खासगी रुग्णालयाने धसका घेत रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीला पाठविले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ तपासाला गती दिली.

येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ कोरोना पॉझिटिव्ह आहे. तर डॉ. नीरज कदम याला निलंबित करण्यात आल्याने उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञाची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या मुलीला रात्रीच वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आरोपी युवकाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here