
कारंजा (घा.) : प्लम्बिंगचे साहित्य घेऊन गुजरातवरून रायपूरच्या दिशेने जाणारा ट्रक नजीकच्या तरोडा घाटात अनियंत्रित होत उलटला. ही घटना सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली असून अपघाताची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याच नागरिकांपैकी काहींनी मदतीसाठी पुढे न येता ट्रकमधील साहित्य घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
प्राप्त माहितीनुसार, प्लम्बिंगचे साहित्य लादून जी.जे. १० एक्स. ८०४८ क्रमांकाचा ट्रक गुजरात येथून रायपूरच्या दिशेने जात होता. भरधाव ट्रक नागपूर अमरावती मार्गावरील तरोडा घाट परिसरात आला असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच ट्रक रस्त्याच्याकडेला उलटला, अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, घटनास्थळी जमलेल्या काहींनी जखमी क्लिनरला रुग्णालयाकडे रवाना केले तर काहींनी जखमीला मदत न करता ट्रकमधील विविध साहित्य घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
जखमीला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.