कार दुचाकीची धडक! दुचाकीचालक जागीच ठार

कारंजा (घाडगे) : कार आणि दुचाकीच्या झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच कारचालक व त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी दुपारी ४ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील राजनी फाट्याजवळ झाला. राजू पंजाब किनकर (७०) रा. नारा असे मृताचे नाव आहे. त्यांचे सहकारी राजेंद्र खवशे रा. नारा, कारचालक सुभाष पराते व त्यांच्या पत्नी या जखमी झाल्यात.

राजू किनकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र खवशे हे दोघेही दुचाकीने गावातील एका मुलाच्या साक्षगंधाकरिता राजनी या गावी गेले होते. कार्यक्रम आटोपून दोघेही गावाकडे परत येत असताना मागाहून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या दुचाकीचा चुराडा झाल्याने चालक राजू किनकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेंद्र खवशे यांच्या पायाला गांभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविले. कारचालक सुभाष पराते व त्यांच्या पत्नीलाही नागपूरला हलविण्यात आले. किनकर आणि खवशे यांच्या अपघाताची वार्ता गावात पोहोचताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती. मृत राजू किनकर यांच्या पश्‍चात पल्ली, दोन मुली, तीन भाऊ, आई-वडील असा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here