पदवीधर बेरोजगारांसाठी वर्धेत 27 मार्चला रोजगार मेळावा ; गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने ता. २७ मार्चला सकाळी १० ते ६ या वेळेत येथील हुतात्मा स्मारकासमोरील चरखा गृह (भवन) येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे ४० नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

सदर रोजगार मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी २७ मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here