

देवळी : येथील शेतकरी मुकुंद आकोबाजी रघाताटे (५६) यांनी सोनेगाव (आबाजी) मार्गावरील स्वतःच्या शेतातील बंड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलीस सूत्रानुसार, नेहमीप्रमाणे मुकुंद हे पहाटे शेतात गेले. त्यानंतर काही शेतमजूर मुकुंद यांच्या शेतात गेले असता त्यांना मुकुंद याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुकुंद यांच्यावर काहींचे खासगी तर बँकेचे कर्ज थकीत असल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच तलाठी कैलास बुगडे यांनी घटनास्थळ गाठले आणि पाहणी करून तहसीलदार राजेश सरवदे यांना प्राथमिक अहवाल सादर केला.
या अहवालानुसार, मृतक मुकुंद तसेच त्यांची पत्री व मुलगा यांचे नावे शेती असून या शेतीवर स्टेट बँकेचे कर्ज आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. मुकुंद यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा आप्तपरिवार आहे. मंगळवारी मृत शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार झाले.