
आर्वी : यंदाच्या वर्षी नैसर्गिक आपत्तीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह पशुपालकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे १०१८ हेक्टरवरील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून, तालुक्यातील चार व्यक्तींचा, तसेच सहा पाळीव प्राण्यांचा यंदाच्या वर्षी नैसर्गिक आपत्तीने बळी घेतला आहे, तर सततच्या पावसामुळे तालुक्यातील ८६ घरांची पडझड झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
या नुकसानग्रस्तांपैकी काहींना १७ लाख ५८ हजारांची शासकीय मदत देण्यात आली आहे, तर ७९ लाख २३ हजारांचा निधी अद्यापही मिळालेला नसल्याने नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या उसंत घेत पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन उत्पादकांकडून सोयाबीनच्या मळणीला गती दिली जात आहे. पण पावसामुळे यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात घट येण्याची भीती वर्तविली जात असल्याने सोयाबीन उत्पादकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
मृतांसह जखमींच्या कुटुंबियांना मदत
तालुका प्रशासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे गतप्राण झालेल्या चार व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहे, तर वीज पडून एक व्यक्ती जखमी झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना ४ हजार ३०० रुपये तातडीची मदत देण्यात आली आहे.
२५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्या कुटुंबाला शासकीय मदत म्हणून १.२५ लाख वितरित करण्यात आले आहे. पावसामुळे पाच घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याने या कुटुंबीयांना २९ हजार ७०० रुपये वितरित करण्यात आले आहे.
सहा घरांचे पूर्णत: तर ८० घरांचे अंशत: नुकसान
तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे चार व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर सहा घरांचे पूर्णतः तसेच ८० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच पाच गोठे पूर्णतः पडल्याने शेतीला पशूपालनाची जोड देणाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे १८४५ शेतकऱ्यांच्या १०१८.६३ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ७१.१४ लाखांची मागणी करण्यात आली आहे.


















































