तीन वर्षांपासून धाम नदीवरील पुलाचे काम थंडबस्त्यात! शेतकयांना नदीतून करावा लागतोय जीवघेणा प्रवास

पवनार : पवनार-वाहितपूर मार्गाला जोडणाऱ्या धाम नदीवरील पुलाचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण कायम आहे. नदीतून डोंग्याच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

तत्कालीन सरकारच्या काळात आमदार पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून सात कोटी पुलाच्या बांधकामासाठी मंजूर झाले होते. नदीपलीकडे पवनार येथील शेतकऱ्याची शेकडो एकर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शेतकरी पुलाची मागणी करीत होते. दरम्यान शेतकरी शेतमजूर नदीतून डोंग्याने या तीरावरून त्या तीरावर जात होते. हा प्रवास एकप्रकारे जीवघेणा होता.

डोंगा उलटण्याची भीती होती. तसा एक छोटा पूल पुढे आहे. परंतु, त्या पुलावरून जाण्यासाठी तीन किमीचा फेरा पडत होता. तो ही पूल आता. नादुरुस्त झाला आहे. एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला असल्याने नदीला बारमाही पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा नदीपात्रातून चालत जाता येत नाही. कंत्राटदाराचे काम अतिशय थंड असून मध्यंतरी काही कामगार कोरोनाग्रस्त झाल्याने काम थांबल्याचे समजते.

तर दुसरीकडे पाणी अडविले असल्याने बांधकाम करण्यास अडचणी येत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले, एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पाणी पातळी कमी करण्यास नकार दिला असून कितीही पाणी असले तरी मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे. मग येथे काय अडचण, असा प्रतिप्रश्न केला जात आहे. बांधकाम विभागाच्या वतीने कामात होत असलेल्या दिरंगाईसाठी दररोज पाच हजार रुपयांचा दंड कंत्राटदारावर लावला जात आहे. तरीसुद्धा काम बंद असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here