साप पकडण्यास जाणाऱ्या युवकावर काळाचा घाला! वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : साप पकडण्यास जात असतानाच दुचाकीला मागाहून भरधाव वाहनाने धडक दिल्याने यात युवकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात इंझापूर गावातील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर झाला. अंकित राजेंद्रसिंह चव्हाण असे मृतकाचे नाव असून विशाल सोनी, बालू चौरागडे असे जखमींची नावे आहेत.

अंकित, विशाल आणि बाळू हे तिघे एका गावातील घरी साप निघाल्याने त्याला पकडण्यासाठी एमएच ३२ एए. १२३० क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान, वायगावकडून वर्ध्यांकडे जात असलेल्या एमएच ३२ वाय. १००९ क्रमांकाच्या भरधाव वाहनाने अंकित चालवित असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली.

यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघात स्थळाहून वाहनचालकाने पळ काढला. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here