

वर्धा : राजकीय द्वेषातून भाजपाचे कार्यकर्ते दिनेश बरटकर यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नालवाडीचे माजी सरपंच तथा पंचायत समितीचे माजी सदस्य बाळकृष्ण माऊसकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी 29 नोव्हेंबरला सकाळी 9.30 बाजता माऊसकर हे आपल्या दुचाकीने धुनिवाले मठ चौकात जात असताना नालवाडी चौकात नरेश रुद्रकारा यांची भेट झाली. त्यांच्यासोबत बोलत असताना दिनेश बरटकर हे बाजूला उभे होते. ते माऊसकर यांना बघून म्हणाले की, तू आमच्या ग्रामपंचायत सदस्यांकडे का जातो. तुला अविश्वास ठराव आणायचा असेल तर तू आपल्या सदस्यांकडे जा. माझ्या सदस्यांकडे का जातो, असे म्हणून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकाराने भिती निर्माण झाल्याने तक्रार देत असल्याचे बाळकृष्ण माऊसकर यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या नालवाडी ग्रामपंचायतीच्या राजकारणावरून घमासान सुरू आहे. उपसरपंच आणि सरपंच यांना पदावरून कमी करण्याकरिता अविश्वास आणण्यास दोन गट सक्रिय झाले आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दिनेश वरटकर यांनी समाज माध्यमांवरही बदनामीकारक मजकूर टाकला असून, त्याद्वारे प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे बाळकृष्ण माऊसकर यांनी नमूद केले आहे.