
सेलू : जंगलापूर येथून दहेगाव गोसावी येथे जात असताना संजय नारायणराव कोल्हे (वय ३२) रा. जंगलापूर हा गंभीर जखमी अवस्थेत दहेगाव रोडवर पडून होता. ही घटना रविवारी केळझर- दहेगाव रोडवरील समृद्धी महामार्गाच्या भुयारी पुलाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम. एच. ३२ एक्यू ००८५ या वाहनाने संजय कोल्हे हा युवक जंगलापूर येथील घरून दहेगाव गोसावी येथे रामकृष्ण शिंगणधुपे यांच्याकडे चौदावीच्या कार्यक्रमाकरिता जात होता.
केळझर- दहेगाव रोडवर समृद्धी महामार्गाचे भुयारी पुलाजवळ सदर तरुण जखमी अवस्थेत रस्त्याने जाणार्या येणाऱ्या लोकांना पडून दिसला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहिती असून त्याला लोकांनीच सेवाग्राम कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला नेण्यात आल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून त्याची दुचाकी गाडीही बेपत्ता झाली असून त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
घटना घडली तेव्हा जोरदार आवाज आल्याने जवळच असलेला शेतकरी घटनास्थळी येत असतांना त्याला घटनास्थळावरून दोन युवक पळताना दिसले. त्यांनी त्या युवकांना जखमीला दवाखान्यात नेण्यासाठी आवाज दिला. परंतु, ते थांबले नाही. घटनास्थळावर मोठी काठी पडून असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे युवकाला मारहाण झाल्याचा संशय युवकाचे वडील नारायण कोल्हे यांनी व्यक्त केला.