रेशनच्या धान्यात आढळले सोंडे! शासनाकडून गरिबांची थट्टा; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

वडनेर : हिंगणघाट तालुक्यातील वेणी गावातील स्वस्त धान्य दुकानातील तांदळात सोंडे, जाळे आणि उंदराच्या लेंड्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाकडून गरिबांची थट्टा सुरू असल्याचे दिसून येते. शासनाकडून मिळत असणाऱ्या खाण्याअयोग्य धान्याबाबत वेणीवास्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे बेकार आणि अयोग्य धान्याबाबत तक्रार केली आहे. जवळपास तीन महिन्यांपासून वेणी गावात निकृष्ट आणि खाण्याअयोग्य धान्य मिळत आहे. स्वस्त धान्य दुकानंदारांनी वेळोवेळी अयोग्य धान्याचे फोटो आणि तक्रार करूनसुद्धा लक्ष देत नसल्याचे सांगण्यात आले.

गरिबांना मोफत धान्य पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचाविले जाईल, असे भाषणात बोलणारे शासनाचे पदाधिकारी आहेत तरी कुठे ? हा प्रश्‍न गावाकरी विचारत आहेत. स्वस्त धान्यामध्ये विटा, माती, जाळी आणि उंदराच्या लेंडया आढळूनसुद्धा शासन बेजबाबदार कां ? शासनाचा अन्नपुरवठा विभाग झोपलेला आहे काय ? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. गावातील सर्व नागरिकांनी स्वस्त धान्याचा पुरवठा दुकानात धाव घेऊन बेकार आणि अयोग्य धान्याबाबत तक्रार केली. आता शासन याकडे लक्ष देईल की, गरिबांना असे निकृष्ट धान्य खाऊ घालणार, असा प्रश्‍न ग्रामस्थांकडून स्वस्त धान्य दुकानदाराला केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here