
वर्धा : पोलीस वेलफेअरच्या वतीने वर्धा शहरातील सिव्हिल लाईन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी पेट्रोल पंप उभारला जात आहे. या पेट्रोल पंपाला आंबेडकरी जनतेचा विरोध नाही, पण ज्या जागेवर हा उभारला जात आहे त्या जागेला विरोध दर्शवीत ती जागा बदलविण्यात यावी, या मागणीसाठी मागील ६७ दिवसापासून पेट्रोल पंप कृती समितीच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू आहे. असे असले तरी पालकमंत्री, काँग्रेसचे आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
आंबेडकरी जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर अँट्रॉसिटी दाखल करण्यात यावा, अशी मागणी भ्रीम टायर सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी केली. दादासाहेब शेळके यांनी सिव्हिल लाईन भागातील आंदोलनस्थळाला सोमवारी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दादासाहेब शेळके पुढे म्हणाले, देशात लोकशाही आहे. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असतो. पण या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मागणीकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्षच करीत आहे. ही निंदनीय बाब आहे.
शासनासह जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी आंबेडकरी जनतेच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पेट्रोल पंपाची जागा बदलवावी. अन्यथा आंदोलन तीव्र करून मंत्र्यांच्या वाहनांच्या काचा फोडून आंबेडकरी जनतेच्या न्यायिक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल, असा इशाराही याप्रसंगी दादासाहेब शेळके यांनी दिला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता. ते आता सरकारने मागे घेतले आहेत. असे असले तरी जे जे शेतकरीहितार्थ आहेत ते सरकारने केलेच पाहिजे. शेतकरीहितार्थ निर्णष घेताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे, असेही दादासाहेब शेळके यांनी स्पष्ट केले.
यावेळी विशाल रामटेके, महेंद्र मुनेश्वर, विशाल मानकर, कैलास इंगळे, विशाल नगराळे, रवी चाटे, अमर धनविज, सुरज बडगे, धम्मा सेलकर, अंकुश मुंनेवार, आदर्श सांगोले, दीपक गेडाम, आदर्श सांगोले आदींची उपस्थिती होती.
















































