


वर्धा : जिल्ह्यात अवैध दारूविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाने हिंगणघाट शहरात मोठी कारवाई करून तब्बल ₹२,५२,००० किमतीची विदेशी दारू जप्त केली. आरोपी मात्र पोलिसांना चकवा देऊन पसार झाला. २५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की संत कबीर वॉर्ड येथील सुजित गावंडे याने आपल्या घरात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा करून ठेवला आहे. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला.
पोलिस पाहताच सुजित गावंडे हा घराच्या मागील भिंतीवरून उडी मारून पळून गेला. शोध घेतला असता तो सापडला नाही. मात्र घरातून रॉयल स्टॅग कंपनीच्या २ लिटर क्षमतेच्या तब्बल ८४ बंफर बाटल्या सापडल्या. या विदेशी दारूचा बाजारभाव ₹२,५२,००० इतका आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. या प्रकरणी आरोपी सुजित गावंडे (रा. संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट) याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक मा. सदाशिव वाघमारे, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स. फौ. मनोज धात्रक, पो. हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) यांनी सहभाग घेतला.