
देवळी : तालुक्यातील पिंपळगाव (लुटे) येथील शेतमालामध्ये लावण्यात आलेला विद्युत करंट एका शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. याप्रकरणी शेतमालकासह त्याला मृतदेह इतरत्र हलविण्याकरिता मदत करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत दशरथ डोंगरे (७३) रा. पिंपळगाव (लुटे) हे त्यांच्याच शेतातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी देवळी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून तपास केला असता त्यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील पिकामध्ये आढळून आला.
यापूर्वी कुटुंबीयांनी शेतातील संपूर्ण परिसर पिंजून काढला पण, मृतदेह गवसला नाही. त्यामुळे हा मृतदेह दुसरीकडून आणून टाकल्याचा संशय बळावला. त्या दिशेने पोलिसांनी तपास करून गोपनीय माहितीच्या आधारावर सुनील किशोर राऊत, रा. देवळी, गजानन कवडू मरापे व सतीश रामराव चौधरी दोघेही रा. पिंपळगाव (लुटे) आणि सुनील दिवाकर मानकर या चौघांना अटक केली. मृतक प्रशांत हे घटनेच्या दिवशी रात्री शेतामध्ये बंदर हाकलण्याकरिता गेले होते.
यादरम्यान त्यांच्या शेतशिवारात एका शेतकऱ्याने पिकांच्या संरक्षणाकरिता विद्युत करंट लावून ठेवला होता. त्या विद्युत प्रवाहाच्या धक्का लागून प्रशांत यांचा मृत्यू झाला. ही बाब दुसऱ्या दिवशी करंट लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गोंधळलेल्या अवस्थेत काही व्यक्तींच्या सहकार्यांने प्रशांतचा मृतदेह त्यांच्या शेतात नेऊन टाकल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. करंट लावलेले शेत सुनील राऊत यांच्या मालकीचे असून त्यांना मृतदेह हलविण्याकरिता गजानन, सतीश व सुनील यांनी सहकार्य केल्याने या चौघांना अटक करण्यात आल्याची म्राहिती देवळी पोलिसांनी दिली.