शिवाजी कॉलनीत सिलिंडरचा स्फोट! बिरे कुटुंबीयांचे दोन लाखांचे नुकसान

पुलगाव : स्थानिक शिवाजी कॉलनी येथील बिरे यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यात कुठ्लीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील साहित्य जळून कोळसा झाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली आहे.

शिवाजी कॉलनी येथील संदीप बिरे व त्यांचे कुटुंबीय घरात झोपून होते. रात्री २ वाजताच्या सुमारास संदीपच्या पत्नीचा अचानक डोळा उघडला. स्वयंपाक खोलीत काहीतरी जळत असल्याचे लक्षात येताच तिने आरडा- ओरड करीत घरातील इतर सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर घरातील सर्वच सदस्यांनी घराबाहेर पळ काढत पाहणी केली असता घरात आग लागल्याचे लक्षात आले.

बिरे कुटुंबियांची आरडा-ओरड ऐकल्यावर परिसरातील नागरिक जागे झाले. घटनास्थळी जमलेल्या परिसरातील नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून मोठा धाडस करीत जळत असलेले गॅस सिलिंडर घराबाहेर काढले. जळत्या गॅस सिलिंडर पासून सर्व व्यक्ती बाजूला होताच अचानक स्फोट झाला. या आगीत संसारउपयोगी साहित्य व इतर साहित्य जळून कोळसा झाल्याने बिरे यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here