देवी विसर्जनासाठी वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ; अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी ; पर्यायी मार्ग खुले राहणार

वर्धा : नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून देवीभक्तांच्या गर्दीने वर्धा शहर दुमदुमले आहे. चौकाचौकात सजलेले देवी मंडप, लंगर, महाप्रसादाचे आयोजन आणि शेजारच्या गावांतून दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या गर्दी व वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशान्वये वाहतूक शाखेकडून काटेकोर नियोजनासह चोख बंदोबस्त उभारण्यात आला आहे.

संध्याकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी जुनापानी नाका, धूनीवाले बाबा मठ, उडानपुल आणि आरती चौक येथे वाहतूक पोलिसांची पॉइंट ड्युटी ठेवण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी देवी विसर्जनाच्या दिवशी दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत अवजड तसेच लहान वाहनांना मिरवणूक मार्गावर प्रवेशबंदी असेल. यासाठी बजाज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान बॅरिकेड्स उभारले जाणार आहेत.

वाहतूक पर्यायी मार्ग…

बजाज चौक → पोस्ट ऑफिस चौक → जेल रोड → आदित्य मेडिकल

बजाज चौक → एस.टी. बसस्टॅण्ड → पोस्ट ऑफिस चौक → आरती चौक → बाहेरील मार्ग

मिरवणूक मार्ग…

बजाज चौक → निर्मल बेकरी चौक → सोशलिस्ट चौक → छत्रपती शिवाजी महाराज चौक → आरती चौक मार्गे पवनार विसर्जन स्थळ.

या मार्गावर मोठी गर्दी तसेच लंगर व महाप्रसादाचे आयोजन होणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.

नागरिकांसाठी सूचना…

विसर्जन मार्गावर अवजड वाहने आणू नयेत.

लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी.

गर्दीत दागदागिने, पर्स, मोबाईल वापरणे टाळावे.

अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here