
पवनार : संसार डोळ्यादेखत जळताना पाहणं ही फार मोठी शोकांतिका आहे. हे दृश्य सोमवारी दुपारी पवनार येथील वॉर्ड क्र. ५ मध्ये दिसले. अल्पभूधारक शेतकरी गजानन पाटील यांच्या घराला अचानक शॉर्टसर्किटने आग लागली आणि काही क्षणांतच घर, संसार व कष्टाने साठवलेली रोकड जळून राख झाली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या घरातून अचानक धूर बाहेर येऊ लागला. त्यावेळी घरातील मंडळी शेतावर गेली होती. परिसरातील नागरिकांनी धूर निघताना पाहताच धाव घेतली. आगीची तीव्रता वाढत असल्याने क्षणाक्षणाला घरातील साहित्य भस्मसात होत गेले.
या आगीत घरातील अन्नधान्य, फ्रिज, पंखे, अंथरुण-पांघरुण, स्वयंपाकाची भांडी, घरातील आडे व लाकडी वस्तू जळून गेल्या. सर्वात मोठा धक्का म्हणजे – मुलीच्या कॉलेजच्या फीकरिता व्याजाने आणलेली तब्बल ५० हजार रुपयांची रोकड सुद्धा आगीत भस्मसात झाली. कष्टाने उभारलेला संसार क्षणार्धात जळून गेला.
आगीच्या ज्वाळा उंचावताच ग्रामस्थ जीवावर उदार होऊन विहिरीचे पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. राजू देवतळे, राहुल देवतळे, प्रवीण पाटील, लोकेश पाटील, अनुप चांदणखेडे, नारायण पाटील, जगदीश साटोने, अमोल उमाटे, अनिल उमाटे, नितीन पाटील, सुहास उमाटे, पवन देवतळे, अंकुश पानकावसे, अतुल पानकावसे, यशनेश खेळकर, संजय पाटील, पंकज उमाटे, प्रफुल पाटील, शुभम कावळे, यश पाटील या तरुणांनी पाण्याच्या बादल्या, मोटर व हँडपंपाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यांची धाडसी धावपळ नसती तर आग शेजारच्या घरापर्यंत पोहोचून मोठा अनर्थ घडला असता.
गजानन पाटील हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीवरच उपजीविका चालते. घर आगीत जळाल्याने आता संपूर्ण कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. त्यांच्यासाठी घरचं छप्पर, संसारसामान, धान्यसाठा आणि रोकड सर्वच आगीत नष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
घटनास्थळी ग्राम महसूल अधिकारी संजय भोयर पोहोचले व नुकसानीचा पंचनामा केला. सेवाग्राम पोलिसांनी सुद्धा भेट देत तपास व पंचनामा पूर्ण केला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने वीज वितरण कंपनीचे अभियंता पांडे यांनी तांत्रिक तपासणी करून आवश्यक अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. पवनारच्या नागरिकांनी शासन व प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून गजानन पाटील यांचा संसार पुन्हा उभा करावा, अशी एकमुखी मागणी केली आहे. अन्यथा गावकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
















































