


वर्धा : गावात अवैधरित्या चालणाऱ्या दारूविक्रीला विरोध करणे एका व्यक्तीला जीवावर बेतले. येसंबा गावातील वसंतराव शिवदास थूल (वय ५९) यांचा २०१९ मध्ये निर्दयीपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाने सहा आरोपींना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. अली यांनी आज (२९ सप्टेंबर २०२५) हा निकाल जाहीर केला.
३ ऑगस्ट २०१९ रोजी येसंबा गावात ही घटना घडली होती. गावात दारूविक्री करणाऱ्या बादल उर्फ विजय सुनील पाटील यास वसंतराव थूल यांनी “गावात दारू विकू नकोस” असा विरोध केला होता. त्याचा राग धरून बादल पाटील याने वसंतराव यांच्या पोटात चाकूने वार केला. त्यानंतर आरोपी आकाश पाटील, स्वप्निल दुपट्टे, राजू दुपट्टे, कैलास जुनघरे आणि मंजुषा पाटील यांनी लाठ्या, काठ्या व बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा जागीच खून केला. या घटनेची फिर्याद मृतकाचा मुलगा प्रतीक थूल याने सेवाग्राम पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक ३८५/२०१९ कलम ३०२, १४३, १४८, १४९ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात आरोपी बादल पाटील (२४), आकाश पाटील (२३), स्वप्निल उर्फ सोनू दुपट्टे (२१), राजू दुपट्टे (४५), कैलास जुनघरे (५५) आणि मंजुषा पाटील (२२) सर्व राहणार येसंबा यांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने कलम ३०४ (२) भा.दं.वि. अंतर्गत प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपयांचा दंड, कलम १४३ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड, तर कलम १४८ अंतर्गत ६ वर्षे सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संजय बोठे यांनी केला. सरकारी वकील श्री. ठाकरे यांनी न्यायालयीन युक्तिवाद केला, तर पोलिस हवालदार जितू डांगे यांनी कोर्ट पैरवी केली. दारूविक्रीला विरोध करताना जीव गमावलेल्या वसंतराव थूल यांच्या खुनाच्या प्रकरणी आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर गावकऱ्यांत दिलासा व्यक्त होत असून, दारूबंदीच्या विरोधाचा आवाज दबवता येणार नाही असा संदेश या निकालातून अधोरेखित झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.