खेक येथे गोठ्याला आग! शेतीउपयोगी साहित्य खाक; शेळी गंभीर: दीड लाखांचे नुकसान

कोरा : नजीकच्या खेक येथे एका गोठ्याला अचानक आग लागली. यात गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. शिवाय एक शेळी गंभीर जखमी झाली. एक तासाच्या प्रयत्नांती मदतकार्य करणाऱ्यांना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

समुद्रपूर तालुक्यातील कोरा परिसरातील खेक गावालगत असलेल्या एका गोठ्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रुद्ररूप धारण करून गोठ्यातील संपूर्ण साहित्य आपल्या कवेत घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत शेतकरी दामा ठाकरे यांच्या मालकीची एक शेळी गंभीर जखमी झाली. शिवाय गोठ्यातील शेतीउपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाण्याचा मारा केला, अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. नुकसानग्रस्त शेतकरी दामा ठाकरे यांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here