ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा गतप्राण, आई गंभीर नागपूर-हैदराबाद मार्गावरील भीषण अपघात

हिंगणघाट : शहरातील नागपूर- हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरी समोर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात. दुचाकीवरील मुलगा गतप्राण झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारी झाला असून गजानन पुसदेकर ४० असे मृतकाचे तर गंगा पुसदेकर (६०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍याच्या उकरडा येथील रहिवासी आहेत.

चंद्रपू येथील चहा ट्रान्स्फर कंपनीचा एम. एच. ३४ बी. झेड. ०१९३ क्रमांकाच्या ट्रकने एम, एच. ३४ बी. इ. १०३८ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. दोन्ही वाहनात धडक होताच गजानन याला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर गंगा या गंभीर जखमी झाल्यात. दुचाकीवरील माय-लेक चंद्रपूरच्या दिशेने जात होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत गंभीर जखमी गंगा यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे, चांगदेव भुरंगे, प्रवीण चौधरी, संपत वलतकर, नितीन राजपूत, अझहर खान, प्रदीप राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here