स्मार्ट कॅाटन प्रकल्पास जर्मनीच्या प्रतिनिधींची भेट

वर्धा : जर्मनीतील जीआयझेड या जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन यंत्रणेच्या प्रोग्राम हेड श्रीमती रोसिट्झा क्रूगर यांच्यासह केंद्रीय वस्त्र मंत्रालयाचे श्री.शिवा, स्मार्ट कॉटन प्रकल्पाचे नोडल अधिकारी जयेश महाजन यांनी स्मार्ट कॉटन या आत्मा कृषी विभागामार्फत सुरू आलेल्या देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील संत गजानन माऊली जिनींग मिल प्रकल्पास भेट दिली आणि प्रकल्पात समाविष्ट शेतकऱ्यांची चर्चा केली.

जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन या यंत्रणेचा वस्त्र मंत्रालय, कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्याशी सामंजस्य करार झालेला आहे. या करारा अंतर्गत तांत्रिक सहकार्य प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांतर्गत शाश्वत आणि मूल्यवर्धित कापूस अर्थव्यवस्था या विषयावर शाश्वत कापूस उत्पादन आणि त्यामध्ये मूल्यवर्धन करून त्यांची प्रक्रिया साखळी मजबूत करणे हा प्रमुख उद्देश आहे.
या यंत्रणेमार्फत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये शाश्वत कापूस उत्पादन व मूल्यवर्धन प्रकल्प सुरू आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत 90 हजार हेक्टर क्षेत्र आणि जवळपास दीड लाख कापूस उत्पादक शेतकरी समाविष्ट करण्याचा मानस आहे. या प्रकल्पात स्मार्ट कॉटन प्रकल्पातील शेतकरी समाविष्ट करता येतील किंवा कसे याबाबत पाहणी व चर्चा करणे हे प्रतिनिधींच्या भेटीचा मूळ उद्देश होता.

या भेटीच्या प्रसंगी आत्माच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, जिल्हा नोडल अधिकारी राधिका बैरागी, कापूस ग्रेडर सतीश कडू, जिनिंग मिलचे मालक श्री.नहाटा उपस्थित होते. सोबतच शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकरी व त्यांचे गट प्रमुख यांनी चर्चेत सहभाग घेऊन ते राबवित असलेल्या स्मार्ट कॉटन प्रकल्पाची माहिती आणि त्यांनी घेतलेला अनुभव यावर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here