सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या! तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आर्वी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भद्रावती तालुक्‍यात घडली. मात्र सासरच्या लोकांनीच हत्या केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तस्मिया ऊर्फ जीनत (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. शेख अहमद शेख बब्यू शेख (४८) रा. आसोलेनगर, पांडुरंग वॉर्ड आर्वी यांची ती मोठी मुलगी असून तिचा विवाह मोहम्मद आमिर आदिल शेख रा. शिवाजी वॉर्ड भद्रावती जि. चंद्रपूर यांच्याशी २०२० मध्ये झाला होता. त्यांना दीड वर्षाचा मुलगा आहे.

विवाहानंतर काही दिवस सुखाचे गेल्यानंतर सासू-सासरे क्षुल्लक कारणावरून सतत तस्मियाशी भांडण करत होते. त्यामुळे पती मोहम्मद आमीर हा तस्मियाला सतत मारहाण करायचा. सातत्याने तिचा छळ सुरू होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या कारणामुळे तिच्या आईवडिलांनी तिला आर्वीला आपल्या घरीसुद्धा आणले होते. पण काही दिवसांनी तिची समजूत घालून तिला सासरी पाठवले. परंतु 3० मार्चला दुपारच्या सुमारास तिने भद्रावती येथील राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे वडिलांनी सासरच्या मंडळीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी पती, सासू व सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तस्मियाचा मृतदेह आर्वीत आणून तिच्यावर मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here