Home ◼️ संपादकीय महागाईचा मोठा झटका ! सर्वसामान्यांच्या खिशाला फटका ; गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा...

महागाईचा मोठा झटका ! सर्वसामान्यांच्या खिशाला फटका ; गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली : महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ जाहीर केली असून नव्या दरांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली आहे. या वाढीमुळे घरगुती खर्चाचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. दिल्लीत सिलेंडरची किंमत ९४२ रुपयांवर पोहोचली असून कोलकात्यात ती ९६८ रुपये झाली आहे. मुंबई आणि पुण्यात ग्राहकांना आता ९४१.५० रुपये मोजावे लागणार आहेत, तर चेन्नईमध्ये सिलेंडरचा दर ९५७.५० रुपयांवर गेला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आता घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढणार आहे. त्यामुळे महागाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने स्वयंपाकघराचा खर्च वाढणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील ऊर्जा उत्पादनांच्या किमतीतील चढ-उतार आणि जागतिक परिस्थितीचा परिणाम एलपीजीच्या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, देशात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही भागात पुरवठ्याची अडचण नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क असल्याचेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!