Home Breaking News जलसंकटाच्या काळात ‘जलवाया’चा कळस! दररोज लाखो लिटर पाणी गळती ; पवनार–सेवाग्राम रोडवरील...

जलसंकटाच्या काळात ‘जलवाया’चा कळस! दररोज लाखो लिटर पाणी गळती ; पवनार–सेवाग्राम रोडवरील गळतीने यंत्रणेची पोलखोल

वर्धा : जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आटल्या आहेत, नळयोजना ठप्प पडल्या आहेत आणि नागरिकांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. महिलांना दररोज किलोमीटरचा पल्ला गाठून पाण्याचे हंडे भरावे लागत आहेत. अशा बिकट परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज असताना पवनार–सेवाग्राम मार्गावर मात्र दररोज लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

रेल्वे क्रॉसिंगजवळील पाईपलाईनमधून सतत होणारी गळती आता नाल्यासारख्या प्रवाहात परिवर्तित झाली आहे. रस्त्याच्या कडेला वाहणारे पाणी, तयार झालेला चिखल आणि झपाट्याने होत असलेली मातीची धूप हे चित्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार केवळ काही दिवसांचा नसून गेल्या अनेक महिन्यांपासून अखंडपणे सुरू आहे, तरीही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

या गळतीमुळे दररोज हजारो नव्हे तर लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जलसंपत्तीचा असा उघडपणे होणारा अपव्यय ही केवळ निष्काळजीपणा नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे.

एकीकडे शासन ‘जलसंवर्धन’, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ यांसारख्या मोहिमा राबवत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या मोहिमांची परिणामकारकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणारे प्रशासनच जर अशा उधळपट्टीकडे डोळेझाक करत असेल, तर जनतेत चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा या प्रकाराची तोंडी माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारी करूनही उपयोग होत नाही अशी भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने तातडीने या गळतीची दखल घेऊन पाईपलाईनची दुरुस्ती करावी, दररोज होणारा लाखो लिटर पाण्याचा अपव्यय त्वरित थांबवावा, तसेच यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रतिक्रिया….

पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती आहे. एका बाजूला अनेक भागात नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जाणे ही चिंतेची बाब आहे. संबंधित विभागाने तातडीने या गळतीची दखल घेऊन योग्य ती दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी.

वैभव उमाटे, युवा उद्योजक पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!